लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन घरांच्या किमती परवडणाऱ्या ठेवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
‘नारेडेको’ म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो-२०२२चा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी समारोप झाला, त्यावेळी बोलत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, नारेडेकोचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप रुणवाल, नारेडेकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी, राजन भालेकर, अभय चांडक आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला त्याच्या हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. त्यातून सामान्यांच्या घराचे स्वप्न साकारताना दिसून येत आहे. विकासकाने घरे बांधत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून पोलिसांना घरे द्यावीत. पोलिसांसाठी घरांना प्राधान्य देण्याकरिता योजना तयार करण्यात येईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"