Eknath Shinde: बापाचे विचार विकले, मग तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 09:03 PM2022-10-05T21:03:50+5:302022-10-05T21:06:04+5:30
बाप चोरला बाप चोरला असं तुम्ही वारंवार म्हणता पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही बापालाच विकण्याचा विचार केलात. मग आम्ही तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?
मुंबई-
बाप चोरला बाप चोरला असं तुम्ही वारंवार म्हणता पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही बापालाच विकण्याचा विचार केलात. मग आम्ही तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते मुंबईत बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात आयोजित दसरा मेळाव्यात बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाषणाला सुरुवात करण्याआधी उपस्थित जनसमुदायासमोर नतमस्तक होऊन खरी शिवसेना कुठं आहे हे आज सिद्ध झालं असं म्हटलं.
आता रावण वेगळा आहे, आता 50 खोक्यांचा 'खोकासूर' आलाय; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर बाण...
"आम्हाला शिवतीर्थवर परवानगी मिळाली नाही तरी आजच्या गर्दीनं खरी शिवसेना कुठं आहे सिद्ध झालं आहे. या विराट सभेला उपस्थित राहणाऱ्या जनतेसमोर मी नतमस्तक मी झालो. कारण आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आला आहात. काल रात्रीपासूनच तुम्ही इथं आलात. कारण बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन जात आहोत. सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी मूठमाती दिली. मी आज सांगतो. शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही. शिवसेना एकनाथ शिंदेंची देखील नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि वारसा विचारांचा असतो. सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचं. बाळासाहेबांचे वारसदार हे विचारांचे वारसदार. वारसा विचारांचा असतो तो जपायचा असतो", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
खरी गद्दारी २०१९ साली झाली
"आम्हाला सारखं गद्दार गद्दार म्हटलं जातं. पण आज मी सांगतो आम्ही गद्दारी नव्हे, हा गदर आहे. गदर म्हणजे उठाव आणि क्रांती. शिवसेनेचं पानिपत होईपर्यंत तुम्ही शांत बसला होता. अडीच वर्ष आम्हाला ही गोष्ट कळली नाही का असं तुम्ही बोलता. पण हे आज जे सगळे आमदार इथं मंचावर आहेत तेच माझ्याजवळ अडीच वर्ष वारंवार आपल्या भावना बोलन दाखवत होते. पण बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आम्ही सहन करत होतो. आम्ही गद्दारी केली नाही. खरी गद्दारी तर २०१९ साली झाली. तुम्ही जनतेच्या मताचा अपमान केलात. जनतेला युतीला कौल देऊनही तुम्ही नकोशी आघाडी केली. मग तेव्हा तुम्ही जनतेशी गद्दारी केली नाही का?", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मला विचार आलेला बीकेसीत हिंदुत्वाचे विचार ऐकायला जाऊ; उद्धव ठाकरे नेमकं काय, म्हणाले पाहा!
"मला मरणाची भीती नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. तुमच्या नावापुढे मुख्यमंत्रीपद लागलं यातच तुमची खुशी होती. पण शिवसेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा हे तुम्हाला दिसलं नाही. अडीच वर्षात तुम्ही मंत्रालयात केवळ अडीच वेळा आलात. कोरोना काळात तुम्ही सगळं बंद केलं. पण तुमची दुकानं मात्र चालू होती. आता कोणती दुकानं चालू होती ते मला बोलायला लावू नका. कारण माझ्यापेक्षा जास्त इतर कुणाला माहित असणार? पाकिस्तान झिंदाबाद बोलणाऱ्यांबाबत तुम्ही कोणतीही भूमिका घेतली नाही? यामागचं कारण काय?", असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"