मागाठाणेच्या एसआरएसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; प्रकाश सुर्वे यांच्या पाठपुराव्याला यश
By मनोहर कुंभेजकर | Published: August 4, 2023 03:09 PM2023-08-04T15:09:57+5:302023-08-04T15:10:19+5:30
मुंबई- मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील एस.आर.ए साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री मोठी घोषणा केली. बोरिवली (पूर्व) देवीपाडा एस.आर.ए ...
मुंबई- मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील एस.आर.ए साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री मोठी घोषणा केली. बोरिवली (पूर्व) देवीपाडा एस.आर.ए मधील झोपडी धारकांना अमिनेस्टी योजने अंतर्गत घरे देण्यात येणार आहेत. येथील महाकाली झोपडपट्टी पुर्वसन प्रकल्प हा गेली कित्येक वर्षे रखडलेला प्रकल्प आता एम.एम.आर.डी.ए बांधणार आहे. तसेच महिन्याभराच्या आत भाडे देखील देण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय या बैठकीत झाला.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील एसआरएच्या समस्या प्रलंबित आहे.मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे गेली अनेक वर्षे या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता मागाठाणेच्या एसआरए समस्या लवकर मार्गी लागणार असल्याचे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार सुर्वे यांनी लोकमतला दिली.
मुख्यमंत्र्यांनी मागाठाणे येथील प्रभाग क्र.१२ मधील महाकाली एस.आर.ए आणि देवीपाडा एस.आर.ए बोरीवली (पू) बाबत झोपडपट्टी पुनर्वसना संदर्भात सदर अधिकारी तसेच आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांच्या शिष्टमंडळ आणि संबंधित अधिकाऱ्यां समवेत संयुक्त बैठक विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात आयोजित केली होती.
सदर बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे,म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर,बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल, विकास नियोजनचे मुख्य अधिकारी, नगरविकास विभागाचे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारत्मक आश्वासनामुळे मागाठाणेच्या एसआरए समस्या लवकर मार्गी लागतील आणि आता येथील नागरिकांना न्याय मिळेल असा विश्वास आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला. सदर बैठकीत शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामणकर,महाकाली एस.आर.ए.चे हेमंत पांडे,अविनाश जाधव,सुभाष ठोंबरे,दीपक पटेल,पालसींग पन्यारी,देवीपाडा एस.आर.ए चे मोहन पटेल,गजानन कासार,राजेश राणे,ऋषिकेश सुर्वे आणि पदाधिकारी उपस्थित होते.