Join us

BMC Election 2022: एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना टार्गेट? आता शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक गळाला लावण्याची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 3:24 PM

BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे तयारीला लागले असून, शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात आणण्याची जबाबदारी बंडखोर आमदारांवर दिल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन महिना उलटायला आला, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. यातच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतान पक्ष टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. 

राज्यभरात शिवसेनेला हादरा दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाने मुंबईतही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांना गळाला लावण्याची तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून खास रणनीती आखण्यात आली असून मुंबईतील (BMC Election 2022) प्रत्येक बंडखोर आमदारावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत किती नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना 'ऑपरेशन मुंबई'ची जबाबदारी दिली आहे. अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविलेल्या खासदार राहुल शेवाळे यांच्या माध्यमातूनही शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यात झालेले सत्तांतर आणि विरोधकांवर तपास यंत्रणांची असलेली वक्रदृष्टी यामुळे मुंबईतील शिवसेनेचे ४० ते ४५ नगरसेवक फुटतील, असा अंदाज आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शिंदे गटाने राज ठाकरे यांच्या मनसेलाही मोठा धक्का दिला आहे. पनवेल, उरण, खारघरमधील अनेक मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मनसेला मोठे खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह ६५ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022मुंबई महापालिका निवडणूक २०२२एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना