मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच आता सर्वप्रथम आम्ही शिंदे गट नाही. शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा गट आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.
हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. एकनाथ शिंदे यांनीही बांगर यांचा सत्कार करत, त्यांची पाठराखण केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष बांगर यांनी शक्तिप्रदर्शन केले नाही. हे त्यांचे प्रेम आहे. बांगर आपले पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मला भेटायला आले होते. त्यांच्या ठिकाणच्या अडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याचा शासन नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.
हा शिंदे गट नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट आहे
शिवसेना खासदारांनी शिंदे गटाशी आणि भाजपशी जुळवून घ्या, असा आग्रह धरल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, सर्वप्रथम हा शिंदे गट नाही. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गट आहे. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतलेली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. ज्यांना ज्यांना ही हिंदुत्वाची आणि भगव्याची भूमिका पटतेय, ते सर्वजण येतायत. समर्थन देतायत, पाठिंबा देतायत आणि सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच आमदार असो वा खासदार असो त्यांची विकासकामे शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार पूर्ण करेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ज्या खासदारांना बाळासाहेब आणि हिंदुत्वाचे विचार पटत आहेत, ते सर्व जण आमच्याशी संपर्क साधून आहेत. सगळेच खासदार त्यांच्या कामांसाठी सातत्याने माझ्याशी संवाद साधत असतात, असे सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.