मुंबई: भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला. भारतीय संतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला.
चांद्रयान-३चं चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भारताच्या चांद्रयानाचं विक्रम हे लँडर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे" अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले. इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरु असलेले प्रक्षेपण 'वर्षा' निवासस्थानी एकनाथ शिंदेंनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्धल मिठाई वाटून आनंद साजरा केला.
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे. बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे. या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे.
दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चांद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.