CM Eknath Shinde On Arvind Sawant : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईत महायुती आणि ठाकरे गटात मोठा वाद झाला आहे. मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंत यांच्याविरुद्ध नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद सावंत यांनी आपल्याला इम्पोर्टेड माल असं म्हटल्याची तक्रार शायना एनसी यांनी केली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांना दिलेल्या उत्तरात त्यांना आयात केलेली वस्तू असल्याचे सांगितले होते. मुंबादेवी परिसरात इम्पोर्टेड मालाची गरज नाही, असं सावंत यांनी म्हटलं होतं. अरविंद सावंत हे काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांच्यासाठी मते मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.
अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. शायना एनसी यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबईतील नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगानेही अरविंद सावंत यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. शायना एनसी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर मुंबई पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिल्या आहेत.
या सगळ्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केलं आहे. "महाराष्ट्रामध्ये महिलांचा अपमान करणं हे दुर्दैवी आहे. ज्यांनी हे केलंय त्या सगळ्यांना लाडक्या बहिणी मिळून घरी बसवतील आणि योग्य ती जागा दाखवतील. बाळासाहेब असते आणि कुणी शिवसैनिकाने असं केलं असते तर त्याचे थोबाड फोडलं असतं. सगळ्या लाडक्या बहिणी मिळून त्यांचा अपमान करणाऱ्यांचा बदला घेतील आणि निवडणुकीत कायमचं घरी बसवतील," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.