Join us

मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचं सर्व काढलं, मग अजित पवारांवरही आले; देवेंद्र फडणवीस म्हणाले जाऊद्या...!

By मुकेश चव्हाण | Published: March 02, 2023 2:39 PM

मी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटलं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी चहापानावरुन विरोधकांवर टीका केली होती. देशद्रोह्यांबरोबर चहापान टळलं, अशी टीका त्यांनी केली होती. यावर विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली होती. शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देशद्रोही म्हटले, असा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादस दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करावा, अशी मागणी केली होती. याबाबतचे पत्रही विरोधी पक्षातील सदस्यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष निलम गोऱ्हे यांना दिले होते. सदर पत्रावर आज एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत आपली भूमिका मांडली.

होय मी देशद्रोही म्हटलं. मात्र मी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटलं होतं. मी माझ्या शब्दांवर आजही कायम आहे. नवाब मलिक यांना देशद्रोही म्हणणं गुन्हा असेल तर हा गुन्हा मी पुन्हा पुन्हा करेल, मी एकदा नाही पन्नासवेळा म्हणले, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. देशद्रोही दाऊद इब्राहीमसह अनिस शेख, छोटा शकील, हसिना पारकर यांच्यावर द्रेशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र नवाब मलिक यांनी हसिना पारकरकडून जमीन घेतली. तसेच सरदार खानकडून नवाब मलिक यांनी एक गाळा देखील घेतला. २००५ साली सरदार खानला मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झाली. 

नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक झाली. यानंतर ईडी, सीबीआयने एनआयए यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांना कोठडी झाली. उच्च न्यायालाय आणि सुप्रीम न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. नवाब मलिकांवर दहशतवादी कलमे देखील लावण्यात आली आहे. त्यांना मी देशद्रोही म्हणालो, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं. देशद्रोही दाऊद इब्राहीमसोबत व्यवहार असणाऱ्या नवाब मलिकांना पाठीशी घालणाऱ्या आणि  राजीनामा न मागणाऱ्या लोकांसोबत चाहा पिणं टळलं असं मी म्हटंल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तसेच अंबादास दानवे तुमचं नवाब मलिक यांना सर्मथन आहे का?, त्यांना द्रेशद्रोही म्हणायचं नाही का?, असा सवाल देखील एकनाथ शिंदेंनी विचारला.

अजित पवारांनी पहिल्यांदा आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हटलं होतं. आम्ही महाराष्ट्रद्रोह काय केला?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला. तसेच २०१९ रोजी मतदारांनी दिलेल्या मतदानाविरुद्ध जाऊन तुम्ही दुसऱ्या पक्षासोबत सत्ता स्थापन केली. हा महाराष्ट्रद्रोह नाही का?, तसेच अजित पवारांनी कितीतरी वेळी कायकाय म्हटलंय..आता सांगू इच्छित नाही...जाऊद्या, त्याच्यात मला पडायचं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले हो जाऊद्या...त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपलं भाषण थांबवलं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एकनाथ शिंदेनवाब मलिकमहाराष्ट्र सरकारअजित पवार