...म्हणून रवींद्र वायकरांना आमच्या पक्षात प्रवेश करावा लागला; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:04 AM2024-03-11T00:04:11+5:302024-03-11T00:07:11+5:30
पक्षप्रवेश सोहळ्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Eknath Shinde ( Marathi News ) : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील मुंबई महानगरपालिकेतून चार वेळा स्थायी समिती सभापती झालेले तसेच मुंबईतील जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांनी आपल्या पत्नी मनीषाताई वायकर तसंच शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "मागील अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने अनेक आमदार, खासदारांची कामे प्रलंबित ठेवल्याने त्यांना काम करणाऱ्या सरकारमध्ये प्रवेश करावा लागला," अला टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
रवींद्र वायकर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "बाळासाहेबांचा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मूलमंत्र जपत गेली ४०-५० वर्षे आमदार रविंद्र वायकर काम करत आहेत. राज्य सरकारने गेल्या दीड- पावणे दोन वर्षात केलेल्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रदीर्घ कामाचा व अनुभवाचा लाभ शिवसेनेला होईल," असं मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, आमदार वायकर यांच्या विभागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते नक्की घेतले जातील, असं आश्वासनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
गेल्या अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने अनेक आमदार, खासदारांची कामे प्रलंबित ठेवल्याने त्यांना काम करणाऱ्या सरकारमध्ये प्रवेश करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विभागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते नक्की घेतले जातील असेही यावेळी… pic.twitter.com/7I1UqqAj0D
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 10, 2024
रवींद्र वायकर काय म्हणाले?
रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करताना आपली भूमिका स्पष्ट केली. "देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. देशाचा कारभार ते चांगल्या पद्धतीने करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तातडीने निर्णय घेतात. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलो आहे," असा दावा वायकर यांनी केला.