मुंबई : राज्यात उद्यापासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे हे अधिवेशन अतिशय वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला आहे. राज्यातील जनतेला न्याय कसा मिळेल यासाठी विरोधी पक्ष पत्र देत असतो. मात्र विरोधकांची परिस्थिती गोंधळलेली दिसतेय. एक आत्मविश्वास गमावलेला विरोधीपक्ष कसा असतो, याचं चित्र दिसत आहे. अवसान गळाल्यानंतर काय होतं, याचं चित्र निर्माण झालं आहे. अजित दादा सरकारच्या कामाची गती पाहून आम्हाला सामील झाले. यामुळे विरोधक गोंधळले आहे. शेवटी संख्याबळाला देखील महत्त्व असतं", असं शिंदे म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले, "सभागृहात जे प्रश्न उपस्थित करतील, लक्षवेधी येतील, लोकांचे प्रश्न उपस्थित होतील, त्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. राज्यातील जनतेचे लक्ष अधिवेशनाकडे असते. विरोधी पक्षाचे काम असते की, सरकार जिथे चांगले काम करते तिथे चांगले म्हणले पाहिजे. आम्ही तिघेही विरोधी पक्षनेता होतो. आमच्याकडे सर्व अनुभवी लोक आहेत. आम्ही विरोधाला विरोध केला नाही."
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री प्रश्नांना न्याय देतील. एक लवकर पहाटे काम सुरू करतात(अजित पवार), मी रात्री उशीरापर्यंत काम करतो. देवेंद्र फडणवीस तर ऑलराऊंडर आहेत. ते बॉलिग करात, बॅटींग करतात, चौकार-षटकार मारतात. फिल्डिंगहीचांगली लावतात. आम्ही तक्रार करायला जागा ठेवणार नाही, असं शिंदे यावेळी म्हणाले.