Join us  

CM Eknath Shinde Live: “राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 4:38 PM

CM Eknath Shinde Live: राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर निषेध केला.

CM Eknath Shinde Live: उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार, हे उद्धव ठाकरेंना विचारावे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेले विधान चुकीचे असून, याचा जाहीर निषेध व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल गांधींकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जात आहे. याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, स्वातंत्र्यवीरांचा जाणीवपूर्वक अवमान केला जात आहे. त्याचा निषेध केवळ राज्यात नाही, तर देशभरात होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार

सावरकरांनी स्वातंत्र्यसमाराशिवाय अनेक मोलाचे काम केले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम सावरकरांनी केले आहे. कितीतरी अनेक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश त्यांच्या योगदानाचा ऋणी आहे. ते फक्त महाराष्ट्राचे दैवत नाही, तर संपूर्ण देशाचे दैवत आहे. सावरकरांच्या झालेल्या अपमानाबाबत सावरकरप्रेमी पक्षीय भेद विसरून संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरलेले आहेत. सावरकरांचा त्याग, देशभक्ती, समर्पण यासाठी राज्यातील विधानसभा क्षेत्र, तालुका, जिल्हा पातळीवर सावरकर गौरव यात्रा काढली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ही यात्रा भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून काढणार असल्याची माहिती देण्यात आली. 

दरम्यान, राहुल गांधींच्या विधानाचा सर्वांनी निषेध करायला हवा होता. राहुल गांधी म्हणतात की, मी सावरकर नाही. गांधी आहे. मात्र, सावरकर होण्याची त्यांची लायकी, पात्रता आणि क्षमता नाही. सावरकरांनी केलेला त्याग तुमच्यात नाही. तुम्ही काय सावरकर होणार, असा सवाल करत, सावरकरांएवढा त्याग, देशप्रेम तुमच्यात नाही. परदेशात जाऊन देशाची निंदा करता हे दुर्दैव आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एकनाथ शिंदेविनायक दामोदर सावरकरराहुल गांधी