मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी रात्री जवळपास दोन तास बंदद्वार चर्चा झाली. नेमके कोणत्या विषयांवर दोघांमध्ये गुप्तगू झाले, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
रात्री साडेअकराच्या सुमारास फडणवीस हे वर्षा बंगल्यावर पोहोचले आणि शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी ते दोघेच हजर होते. त्यामुळे तपशील समजू शकला नसला तरी अंदाज बांधले जात आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा विषय सध्या ऐरणीवर आहे. ९ ऑगस्ट २०२२ पासून विस्तार होऊ शकलेला नाही. मात्र, लवकरच विस्तार केला जाईल, असे शिंदे यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यामुळेच शिंदे-फडणवीस यांच्यात विस्ताराबाबत चर्चा झाली असा कयासही बांधला जात आहे. काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतही चर्चा झाल्याचे समजते. लवकरच काही बदल्या होतील, अशी शक्यता आहे.
फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सोमवारी रात्री उशिरा सुमारे दीड तास चर्चा केली होती. ‘शिवतीर्थ’ या राज यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीनंतर, राजकारणावर आमची चर्चा झाली नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेला जोडूनच शिंदे-फडणवीस चर्चेकडे बघितले जात आहे.
समन्वय वाढवण्यावर आणखी भर देणार
- भाजपने मिशन लोकसभा २०२४ हाती घेतले आहे. राज्यात ४२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, या मिशनमध्ये अद्याप शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला सहभागी करून घेण्यात आलेले नाही.
- भाजप-शिवसेना युती म्हणून हे मिशन कसे हाती घेता येईल, याबाबतही चर्चा झाल्याचे म्हटले जाते. युती म्हणून महाविकास आघाडीचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी अधिक चांगला समन्वय असणे आवश्यक आहे.
- हा समन्वय वाढविण्यासाठी दोन्ही पक्षांमधील कोणत्या नेत्यांवर जबाबदारी सोपवायची या विषयीदेखील दोघांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.