शिंदे-फडणवीस आज दिल्लीला, नावं निश्चिती अन् लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 03:22 PM2023-06-17T15:22:50+5:302023-06-17T15:30:09+5:30
आताच्या घडीला राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत
मुंबई - केंद्रात मोदी, राज्यात शिंदे अशा आशयाची जाहिरात महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्र पानांवर झळकल्यानंतर शिंदे-फडणवीस यांच्यात काहीतरी बिनसलंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तर, शिवसेना-भाजपाकडून एकमेकांना कमी-अधिक दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही दिसून आले. त्यातच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेऊनही अद्याप राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. सर्वोच्च निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंची दिल्लीवारी झाली, पण विस्तार अद्यापही रखडलाच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. यावेळी, देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत असल्याची माहिती आहे.
आताच्या घडीला राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष, नेते कंबर कसून तयारीला लागले आहेत. विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिवसेना शिंदे गटासह अन्य मित्र पक्षांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला. वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा, असे रामदास आठवले म्हणाले. तर, शिंदे-फडणवीस जोडी आजच दिल्ली दौऱ्यावर असून गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचे समजते.
दिल्लीच्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांची म्हणजेच भावी मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार असल्याचीही माहिती आहे. या बैठकीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून कदाचित पुढील २ ते ३ दिवसांत हा विस्तार होईल, अशीही शक्यता सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, जाहिरात वादानंतर प्रथमच मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार करा - आठवले
वाद करण्यात आणि मिटवण्यातही आम्ही ॲक्टिव्ह आहोत. एक दिवस एक जाहिरात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली त्यात आमचा वाद मिटला. राज्यातील अनेक प्रश्न अद्यापही संपलेले नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार करा, कार्यकर्त्यांना, लोकांना कामाला लावा. उगाच वाद करत बसू नका. मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या पक्षालाही प्रतिनिधित्व द्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.