Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार समोर आला आहे. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग करणारी अनिक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हीला पोलिसांनी अटक केली असून, अनिल जयसिंघानी फरार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण हीन पातळीला पोहचले आहे. मला अडकवण्यासाठी कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. या तरूणीच्या संभाषणात काही पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. पुरावे मिळाल्यावर ती उघड करेन, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला या प्रकरणी माहिती दिली. यानंतर मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले.
खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये
याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हा सभागृहात निवेदन दिलं आहे. यातील आरोपी अनिल जयसिंघानी हा महाविकास आघाडीतल सर्व पक्षात गेला होता. याची सखोल चौकशी होणार आहे. जाणीवपूर्वक ही बदनामी करण्यात आली आहे. याच्या पाठीमागे कोणी असतील त्याचा नक्की शोध लागेल. खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये, ही परंपरा आहे. आरोपीची नक्की शोध लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, गृहमंत्री असताना सुद्धा तुम्हाला माहिती नाही की, तुमच्या घरी कोण येत आहे. उद्या दाऊदची नात येईल आणि सांगेल मी फॅशन डिझायनर आहे. मला आई-वडील नसल्याने माझी प्रसिद्धी करण्यास मदत करा. त्यामुळे याची तुम्हाला माहिती नाही किंवा यात तुम्ही सामील आहात. म्हणून स्वतंत्र चौकशी केल्याने सर्व समोर येणार आहे, असे सांगत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"