मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कांदा दरावरुन शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून याच मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले. तर सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
दोन दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यातील झाडी बोरगांव येथील एका शेतकऱ्याने कांदा विकल्यानंतर केवळ १ रुपयांचा चेक आडत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यास देण्यात आला होता. संबंधित व्यापाऱ्यावर बाजार समितीने कारवाईही केली. मात्र, हा मुद्दा राज्यभर गाजला, त्यानंतर विरोधकांनी कांद्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. कांद्याला भाव मिळाला पाहिजे, अशी भूमिका विरोधकांनी घेतलीय. यावेळी आम्ही कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांबाबत सभागृहात सविस्तर माहिती दिली. मात्र एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण सुरु केले असता विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी बाजूला बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्वरित उठले आणि एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री जबाबदारीने सांगताय की कांद्याची खरेदी सुरु झालीय. आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं आहे, हे एकदा ठरवलं पाहिजे. मुख्यमंत्री सांगताय की नाफेडने कांदा खरेदी सुरु केलीय, मग विरोधकांकडे वेगळी माहिती असेल तर त्यांनी हक्काभंग आणावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, कांद्याचे दर कोसळल्याने नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. सुमारे ५ क्विंटल कांद्याच्या विक्रीनंतर शेतकऱ्याला केवळ १८ रुपये शिल्लक राहत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा अतिशय गरीब शेतकरी आहे. त्यामुळे आता देखील दिलासा देण्यासाठी तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"