मुंबई - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी २६ जानेवारीचा मुक्काम नवी मुंबईतच केला असला तरी उद्या सकाळी ११ पर्यंत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. नोंदी मिळालेल्या लोकांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र वाटप करावे अशी मागणी करत याचा अध्यादेश सरकारने तातडीने काढावा अशी मागणी केली होती. त्याचसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीला शासनाचे अधिकारी उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंनी प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची ही तातडीची बैठक बोलावली. त्यात जरांगे पाटील यांनी आज केलेल्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याशिवाय सुरक्षेच्या बाबतीतही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्यातील बहुतांश मुद्द्यांवर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शासनाकडून सगेसोयरे यांच्याबाबतीत आजच रात्री उशीरापर्यंत किंवा सकाळपर्यंत जीआर काढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळताना दिसून येत आहे. या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.
काय म्हणाले होते जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी भाषणात म्हटलं की, ५७ लाख नोंदी मिळाल्याची तसेच यातील ३७ लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केल्याची माहिती सरकारने दिली. या सर्वांचा डेटा मागितला आहे. त्याशिवाय प्रत्येक नोंदीवर पाच जणांना जरी आरक्षण मिळालं तरी अडीच कोटी मराठ्यांना आरक्षण मिळेल असा विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला. परंतु त्यासाठी सरकारकडून सगेसोयरे यांच्याबाबतीत अध्यादेश काढायला हवा. त्यावर सरकारने ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्याकडून शपथपत्रे घेऊन त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देऊ असं सांगितले असल्याची माहिती जरांगेंनी दिली.
दरम्यान, सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा यावर सरकारने अद्याप जीआर काढलेला नाही. यासंदर्भातील अध्यादेश २७ जानेवारी सकाळी ११-१२ वाजेपर्यंत काढावा अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली. सरकारनं अध्यादेश काढेपर्यंत आम्ही मुंबईत जाणार नाही, आजची रात्र वाशीतच थांबणार, मात्र अध्यादेश आला नाही तर उद्या आझाद मैदानावरच जाणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.