Join us

“संघर्ष होता प्रत्येक वाटेवर, वार होते कडवट-जिव्हारी-विखारी; देव, देश आणि धर्मासाठी...”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 4:05 PM

शिवछत्रपतींचा विचार, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श, धर्मवीरांची हीच शिकवण प्रखर हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी सज्ज पुन्हा शिवसेना, असे खास ट्विट करण्यात आले आहे.

Shiv Sena Shinde Group Tweet: भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीचे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले आहे. एकीकडे सरकारकडून वर्षपूर्तीनिमित्त विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती दिली जात असताना, दुसरीकडे विरोधकांकडून टीका केली जात आहे. यातच शिवसेना शिंदे गटाकडून एक खास ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, वर्षभराच्या प्रवासाचा यात आढावा घेण्यात आला आहे. 

शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेची सर्व सोशल मीडिया खाती ठाकरे गटाने आपल्याकडे ठेवली. शिंदे गटाचे अधिकृत सोशल मीडिया खाते नव्हते. अखेर, शिवसेना शिंदे गटाने त्यांचे अधिकृत सोशल मीडिया खाते लॉन्च केले. या खात्यावरून आता शिंदे गटाविषयीच्या कार्यक्रमांची अधिकृत माहिती दिली जाते. याच खात्यावरून सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ट्विट करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना.. आशीर्वाद शिवछत्रपतींचे एक वर्ष सुराज्याचे…, असे ट्वीट शिवेसनेच्या अधिकृत खात्यावरून करण्यात आले आहे. 

संघर्ष होता प्रत्येक वाटेवर, वार होते कडवट-जिव्हारी-विखारी

यामध्ये एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यापासून आतापर्यंत काय काय घडले याचे काही महत्त्वाचे क्षण अधोरेखित करण्यात आले आहेत. संघर्ष होता प्रत्येक वाटेवर, प्रत्येक वाट होती रोखलेली, वार होते कडवट, जिव्हारी आणि तेवढेच विखारी. पण एकाकी लढाई होती, देव, देश आणि धर्मासाठी म्हणून फडकला भगवा वादळातही. नेतृत्त्वाने कवेत घेतला अवघा आसमंत संपवले दरबारी राजकारण आणि गहिवरून गेले जनमन. सुरू प्रत्यक्ष गतिमान कारभार, विकासाची दिसली दिशा, महाराष्ट्राच्या समृद्धीची उजळली भाग्यरेषा. सुराज्याच्या उदयाने आली वेगवान कारभाराची प्रचिती, जनतेच्या सरकारची झाली वर्षपूर्ती. शिवछत्रपतींचा हाच विचार, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा हाच आदर्श, धर्मवीरांची हीच शिकवण या महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी प्रखर हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी सज्ज पुन्हा शिवसेना, असे बोल या व्हिडिओमध्ये आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील काही वाक्येही या व्हिडिओत ऐकायला येत आहेत. तसेच, वर्षभरात सरकार स्थापन झाल्यापासून काय काय अडचणी आल्या, सरकारने कसे कसे काम केले याचा आढावाही या व्हिडिओच्या माध्यमातून काव्यरुपाने सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदे