धनगर समाजाला न्याय देऊ; जे काही करायला हवं ते नक्की करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 12:23 PM2022-07-25T12:23:13+5:302022-07-25T12:29:07+5:30
धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या धनगर बांधवांशी एकनाथ शिंदेंनी रविवारी संवाद साधला.
मुंबई- धनगर समाज बांधवांवर आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, तसेच ज्या ३ धनगर समाजबांधवांनी आरक्षण आंदोलनात आत्मदहन केले. त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
धनगर समाजासाठी जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत देखील लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली. राज्यातील धनगर समाज बांधवांच्या विविध प्रश्न मांडण्यासाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या धनगर बांधवांशी एकनाथ शिंदेंनी रविवारी संवाद साधला.
धनगर समाज बांधवांवर आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू तसेच ज्या ३ धनगर समाजबांधवांनी आरक्षण आंदोलनात आत्मदहन केले त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये मदत दिली जाईल,
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 24, 2022
तुमच्या ज्या काही हक्काच्या मागण्या आहे, त्याला मी नक्की हात घालणार आहे. न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. धनगर समाजाच्या मागण्या आहेत. एक एक काम आपण मार्गी लावू. एक-एक सुविधा देऊ. धनगर समाजासाठी जे काही करायला पाहिजे ते नक्की केलं जाईल, एवढी खात्री बाळगा, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात श्रेयवादाची लढाई होतच राहील. पण ओबीसींना आरक्षण मिळालं, ही चांगली गोष्ट आहे. जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की ओबीसी आरक्षण आम्ही मिळवून दिलं, मग अशाच पद्धतीने त्यांनी धनगर समाजालाही आरक्षण मिळवून द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.