Join us

सर्वजण स्वार्थासाठी एकत्र; पक्ष सांभाळू न शकणारे इंडिया आघाडी काय सांभाळणार?- CM शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 4:05 PM

इंडिया आघाडीत सर्वजण फक्त स्वार्थासाठी एकत्र आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुंबई: विरोधी पक्षांच्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव्ह अलायन्स म्हणजे इंडियाची मुंबईत तिसरी बैठक होत आहे. काल या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीपूर्वी INDIA आघाडीचा लोगो आणि संयोजक नावाची घोषणा होऊ शकते असं बोलले जात होते. परंतु आता इंडिया आघाडीचा लोगो जाहीर होणार नाही. त्यासोबत संयोजकाचेही नाव घोषित होण्याची शक्यता फार कमी असल्याचे बोलले जाते.

इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झालेले बहुतांश पक्ष आधी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवावा अशी मागणी आहे. जागावाटपावर सहमती झाल्यानंतरच लोगो आणि संयोजकाच्या नावावर पुढे जाऊ. इंडिया आघाडीत सहभागी पक्ष काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हणत आहेत. बैठकीत आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना जागावाटपावर जोर दिला होता. इंडिया आघाडीच्या या बैठकीवर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

इंडिया आघाडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेषाने पछाडलेली लोक आहेत. स्वार्थाच्या पलीकडे विरोधकांना काही दिसत नाही. इंडिया आघाडीतील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. इंडिया आघाडीत ही स्वार्थाची मोठी टोळी असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. इंडिया आघाडीत सर्वजण फक्त स्वार्थासाठी एकत्र आहेत. त्यामुळे देशातील जनता इंडिया आघाडीच्या टोळीला घरचा रस्ता दाखवेल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.

पक्ष सांभाळू न शकणारे इंडिया आघाडी काय सांभाळणार?, असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच इंडिया आघाडीचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही. इंडिया आघाडी फक्त नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. इंडिया आघाडी संयोजक, लोगो ही ठरवू शकले नाहीत, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. 

दरम्यान, सध्या जो लोगो बनवण्यात आला आहे. त्यात आणखी काही सुधारणा करण्याची गरज असल्याने त्यात काही नेत्यांकडून येणाऱ्या सूचनांचाही समावेश असावा. त्यामुळे इंडिया आघाडीचा लोगो आज जारी होण्याची शक्यता नाही. लोगोबाबत सर्व पक्षाशी चर्चा केल्यानंतर, त्यांचे मत घेतल्यानंतर सहमतीनेच अधिकृतपणे इंडिया आघाडीचा लोगो लॉन्च केला जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. समाजवादी पक्षालाही मध्य प्रदेशात काही जागा लढवायच्या आहेत. त्यामुळे हा पक्ष जागावाटपावर जास्त जोर देतोय. त्यामुळे काँग्रेसकडून आजच्या बैठकीत जागावाटपाबाबत काय भूमिका येते हे पाहणे गरजेचे आहे. इंडिया आघाडीच्या लोगोबाबत आघाडीत सहभागी पक्ष हा लोगो आपल्या पक्षाच्या चिन्हासोबत वापरायचा की नाही हे अद्याप ठरवू शकले नाहीत. काही पक्षांच्या मते, निवडणूक काळात इंडिया आघाडीचा लोगो वापरायला हवा. तर काहींच्या मते निवडणुकीत केवळ पक्षाचे चिन्ह वापरायला हवे असं मत आहे.

टॅग्स :इंडिया आघाडीएकनाथ शिंदेभाजपाकाँग्रेसउद्धव ठाकरे