'मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला'; एकनाथ शिंदेंनी करमरकर यांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 05:41 PM2023-03-06T17:41:12+5:302023-03-06T17:41:37+5:30

मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक विष्णू विश्वनाथ करमरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे

CM Eknath Shinde has paid tribute to the father of Marathi sports journalism, Vishnu Vishwanath Karmarkar. | 'मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला'; एकनाथ शिंदेंनी करमरकर यांना वाहिली श्रद्धांजली

'मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला'; एकनाथ शिंदेंनी करमरकर यांना वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

मुंबई: मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक, माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर यांचे आज सकाळी मुंबईतील अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. 

करमरकर यांनी पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक नंतर मुंबईतील दैनिक लोकमित्रमधून केली होती. १९६२मध्ये करमरकर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख झाले. खेळाच्या बातम्या, क्रीडासमीक्षणे व स्तंभलेखन आदींनी मराठी वाचक जोडला जाऊ लागला. यामुळे हळूहळू सर्वच दैनिकांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.

करमरकर यांच्या निधनांनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दिवंगत करमरकर यांनी क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांनी वृत्तपत्रांत क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी स्वतंत्र पान सुरू करण्यात पुढाकार घेतला. या अर्थाने ते मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ठरले. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द मिळवून दिले. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. करमरकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे अतोनात नुकसान झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, १९८२च्या दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बांधकामात सुमारे १०० मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’ मधून मांडली होती. त्यांनी सुरेश कलमाडी यांच्यावर देखील टीका केली होती. क्रीडा संकुलांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांना वाचा फोडली होती. करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, एमए करत करमरकरांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली होती. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: CM Eknath Shinde has paid tribute to the father of Marathi sports journalism, Vishnu Vishwanath Karmarkar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.