मुंबई: अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. आज अरविंद केजरीवाल यांनी आज मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते.
नाती जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. राजकारणापलिकडे जाऊन आम्ही नाती जपतो. केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. दिल्लीसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी आवश्यक होता. परंतु केंद्र सरकारने अध्यादेश आणला, ही कसली लोकशाही?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. तसेच अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे. कोणीही कोणालाही भेटू शकतो. कुणालाही भेटल्याने निवडणूका जिंकता येत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. हुकुमशाही सुरू आहे की नाही जनता ठरवेल. देशाची प्रगती लोकांना दिसतेय. जी ७० वर्षांत देशाची प्रगती झाली नाही, ती गेल्या ८-९ वर्षांत झाली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आगामी काळातील लोकसभेच्या निवडणूकीत आतापर्यंतचे जे काही रेकॉर्ड आहे, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तुटतील, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध विरोधक एकत्र येत आहेत. त्याच भूमिकेतून केजरीवाल यांनी आज मुंबईत जाऊन मोदी सरकारने दिल्ली सरकारविरुद्ध वटहुकूम काढत हुकूमशाही केल्याचं म्हटलं. तसेच, राज्यसभेत या अध्यादेशासंदर्भातील विधेयक मांडलं जाईल, तेव्हा शिवसेना याचा विरोध करेल, तसेच आम्हाला समर्थन करेल, असे वचन उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिले, असेही केजरीवाल यांनी म्हटले. जर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं नाही, तर २०२४ मध्ये देशात मोदी सरकार येणार नाही, असे भाकीतही केजरीवाल यांनी केले.