Join us

'महाराष्ट्राची परंपरा कायम राखण्याचे काम भाजपाने केलंय'; एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:19 AM

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने अचानक माघार घेतल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठे बळ मिळाले. भाजपाचे मुरजी पटेल यांनी माघार घेतली असली तरी लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात असल्याने ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होईल. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी भाजपाने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा कायम राखण्याचं काम भाजपाने केलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे प्रभारी सी. टी. रवी यांच्याशी चर्चा केली. रवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशीही चर्चा केली. रवी यांनी मुंबई भाजपच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली व नंतर माघारीचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवारांपैकी एका उमेदवारास आपले मत देऊन नागरिकांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

मुरजी पटेल समर्थक संतप्त

मुरजी पटेल यांच्या संतप्त समर्थकांनी भारतीय जनता पक्षाने त्यांना माघार घ्यायला लावल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीही केली. एक समर्थक माध्यमांसमोर रडला. घोषणा करण्यापूर्वी मुरजी पटेल यांना आधी विश्वासात घ्यायला हवे होते, असे समर्थकांचे म्हणणे होते. 

टॅग्स :एकनाथ शिंदेभाजपादेवेंद्र फडणवीस