मुंबई: सरकार तुमच्या पाठीशी आहे, हे दाखवण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं आहे. शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देतो अस सांगितलंय. त्यामुळे काहीही झालं तरी ते आपला शब्द पाळतील, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.
सरकारला काही गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. तातडीने निर्णय घेणे शक्य होत नाही. जरांगे पाटील यांनीही थोडा विचार करावा. आंदोलन मागे घेऊन सरकारला या कामात जरांगे यांनी सहकार्य करावे, असं आवाहनही संजय शिरसाट यांनी केलं आहे. हे आंदोलन शांततेत सुरु आहे. मात्र काही लोकांनी हे आंदोलन बिघडवण्याचा प्रयत्न केला. सरकारला याबाबत प्राथमिक चौकशीतून समजलंय, त्याचा तापस देखील होतोय, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
सर्वसामान्यांचे जीव जातील अशी कोणीतीही कृती कोणीही करू नये अन्यथा सरकार त्यांना सोडणार नाही. आंदोलनात कोणतीही हिंसा असू नये. या आंदोलनाच्या अनुषंगाने राजकीय वक्तव्य करणे योग्य नाही, असं संजय शिरसाट यांनी सांगितले. तसेच सरकारने भडक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, असं आवाहन देखील संजय शिरसाट यांनी केलं आहे.
दरम्यान, आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. परंतु, सरकार खोट्या केसेस दाखल करीत आहे. केसेसला घाबरून आरक्षणाच्या लढ्यातून मागे सरकू नये. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. सरकारने वातावरण दूषित करू नये. आता माझे बोलणे कधी बंद होईल, हेच मला माहिती नाही. त्यामुळे शासनाने वेळ कशासाठी हवा, किती हवा, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का हे इथं येवून सांगावे. आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले होते.