CM Eknath Shinde: अलीकडेच NDA मित्रपक्षांची महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीला ३८ पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दिल्लीवारीत एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे अधिवेशन संपल्यानंतर दिल्लीला रवाना होत आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला एका खासगी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार असल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना अर्थखाते देण्यात आले. तसेच राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दिवसेंदिवस मंत्रिमंडळ विस्तार रखडत असल्याबाबत शिंदे गटातील नेते तसेच मित्र पक्षांमध्ये नाराजी वाढत जात असल्याची चर्चा आहे. पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार होईल, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या अनेक दिल्लीवाऱ्या झाल्या आहेत. एनडीए बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाल्यानंतर अजित पवार आणि अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्यात अर्धा तास बैठक पार पडल्याची माहिती समोर आली होती. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.