Join us

CM Eknath Shinde: फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात का येऊ शकला नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनाक्रमच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:55 AM

नवीन सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रयत्न केले. मात्र, गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबई: मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. शिंदे गटाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पाडली. यामध्ये संघटनात्मक कामांवर भर देण्यात आला असून, त्यासंदर्भातच सविस्तर चर्चा झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो राज्याला का मिळू शकला नाही, याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. 

शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीनंतर ते मीडियाशी बोलत होते. 

गेल्या दोन वर्षात अपेक्षित रिस्पॉन्स मिळाला नसावा

या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. यावेळी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी प्रयत्न करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, बिलकूल आम्ही पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो असताना, राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यासंदर्भात सांगितले होते. उद्योग तसेच पायाभूत सुविधांबाबत राज्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, रेल्वेमंत्री, केंद्रीय उद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली. राज्यात नवीन उद्योग, प्रकल्प आणण्यासाठी पूर्ण क्षमता आहे आणि सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचा प्रयत्न करू, राज्यात नवीन उद्योग येण्यासाठी केंद्राचे सहकार्य आवश्यक आहे. यासंदर्भात केंद्रातील नेत्यांची भेटही घेणार आहे. राज्यात नवीन प्रकल्प आणण्याबाबत आमचे सरकार नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेना