मुंबई - राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे-शिंदे असा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या या दोन्ही गटात एकमेकांचे कार्यकर्ते पळवापळवी सुरू आहे. त्यात अलीकडेच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. लवकरच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार होते. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार असं म्हटलं जात होते. तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजगृहावर जात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राजगृह येथे बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं. त्यांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यात आली. खऱ्या अर्थाने त्यांनी अभ्यासासाठी ज्या ज्या वस्तू वापरल्या. टेबल्स, खुर्ची त्या जशाच्या तशा आहेत. हा ऐतिहासिक ठेवा मला मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळाला. ही वास्तू बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आज प्रकाश आंबेडकरांचीही माझी भेट झाली. ही सदिच्छा भेट होती. यात कुठलंही राजकीय समीकरण नाही. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये. निव्वळ सदिच्छ भेट होती. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे भूषण होते. त्यांचे वास्तव या वास्तूत होते. तिथे भेट दिली. त्यामुळे यातून कुणीही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. माझी आणि त्यांची राजकीय चर्चा झाली नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिवशक्ती-भीमशक्ती युतीची चर्चागेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची जाहीर इच्छा बोलूनही दाखवली होती. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा झाली असून लवकरच त्यांची भेट होणार असल्याचे सांगितलं जात आहे. यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना या युतीला खुला पाठिंबा दर्शवला होता. प्रकाश आंबेडकरांची स्वत:ची ताकद आहे. ही ताकद आणि शिवसेना एकत्र आल्यास महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी होऊ शकते असं दानवेंनी म्हटलं होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"