Join us  

बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदारांची भेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्लॅन तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 1:55 PM

एकनाथ शिंदे यांनी चेंबूर येथे लिलाधर डाके यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते मनोहर जोशींच्या भेटीलाही जाणार आहेत.

मुंबई - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध करत एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदार, खासदारांसह शिवसेनेत बंड पुकारलं आहे. खरी शिवसेना आमचीच, बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे घेऊन जाणार असा दावा शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गजनान किर्तीकर यांच्यानंतर ज्येष्ठ नेते लिलाधर डाके, मनोहर जोशी यांच्या भेटीला गेले आहेत. 

एकनाथ शिंदे यांनी चेंबूर येथे लिलाधर डाके यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे म्हणाले की, डाकेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी सदिच्छा भेट घेतली. लिलाधर डाके यांचे पक्षाचे योगदान मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांसोबत जे सुरूवातीला होते त्यात डाकेंचा समावेश होता. त्या काळात प्रतिकुल परिस्थितीत डाकेंनी शिवसेना वाढीचं काम केले. आज शिवसेनेचे जे रुप आहे त्यात डाके यांच्यासारख्या नेत्यांचे फार मोठे योगदान आहे. मंत्रिपद मिळूनही साधी राहणी, प्रामाणिकपणे त्यांनी काम केले. स्वत:साठी काही केले नाही. जे केले शिवसेना या चार शब्दांसाठी. बाळासाहेबांच्या आदेशाने त्यांनी काम केले. अशा नेत्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेली यासाठी ज्येष्ठ नेते म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या भेटीला गेला असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत शिवसेनेत ज्यांचे फार योगदान आहे त्यांचे राज्यातील मुख्यमंत्री झाल्यानंतर नक्कीच आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. या नेत्यांचा अनुभव राज्यातील जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी करायचा आहे. त्यामुळे मनोहर जोशी यांचीही भेट घेणार आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागे राजकीय चर्चाही सुरू आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण आम्हालाच मिळावं यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यानुसार जास्तीत जास्त नेते आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. 

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईलमंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. जेव्हापासून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार हाती घेतला तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. पेट्रोल डिझेलचे दर कमी केले. सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाबाळासाहेब ठाकरे