CM Eknath Shinde Live: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल गांधींकडून वारंवार अवमान, अपमान होत असल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींच्या विधानाचा सर्वांनी निषेध करायला हवा होता. राहुल गांधी म्हणतात की मी सावरकर नाही. गांधी आहे. मात्र, सावरकर होण्याची त्यांची लायकी, पात्रता आणि क्षमता नाही. सावरकरांनी केलेला त्याग तुमच्यात नाही. तुम्ही काय सावरकर होणार, असा सवाल करत, सावरकरांएवढा त्याग, देशप्रेम तुमच्यात नाही. परदेशात जाऊन देशाची निंदा करता हे दुर्दैव आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार, हे उद्धव ठाकरेंना विचारावे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेले विधान चुकीचे असून, याचा जाहीर निषेध व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांना बाळासाहेब ठाकरे यांनी कानशिलात लगावली होती. अशी हिंमत उद्धव ठाकरे दाखवणार का, सावरकरांच्या अपमानाबाबत उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या कानशिलात लगावणार का, असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला.
केवळ बोलणे वेगळे आणि करून दाखवण्यात हिंमत लागते
सत्तेसाठी महाविकास आघाडीत तुम्ही गेलात. केवळ बोलणे वेगळे आणि सांगणे वेगळे. करून दाखवायला हिंमत लागते. तुम्ही मारल्यासारखे करा आणि मी रडल्यासारखे करतो, असा प्रकार सुरू आहे. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य असेल, तर काय ते करून दाखवावे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला. आज बाळासाहेब असते, तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जोडे मारले असते. इतकेच नाही तर सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन करणाऱ्यांनाही जोडे हाणले असते, अशा कानपिचक्या देत, सावरकरांच्या अपमानाबाबत हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मविआमधून बाहेर पडावे, असे खुले आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिले.
दरम्यान, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांचा धिक्कार केला, त्यांच्यासोबत ते गेले. यानंतर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. हिंमत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवे, असे चॅलेंज देत, राज्याच्या विधानसभेत सावरकरांच्या अपमानाबाबत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या नेत्यांनी राहुल गांधींविरोधात चकार शब्द काढला नाही. राहुल गांधींची खासदारकी जी कायद्याने गेली, त्याचा निषेध करायला काळ्या फिती लावून यांच्या बरोबर जाऊन उभे राहिले. मूग गिळून गप्प राहिले. उलट त्यांचे चिरंजीव म्हणाले की, हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. भूमिका वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच हे तुम्ही ठरवून करताय. चारही बाजूंनी भडिमार झाल्यामुळेच सावरकरांचा अपमान सहन न करण्याची बतावणी करण्यात आली, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"