मुंबई: सन २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार येणार नाही, हे निश्चित झाले होते. महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी वाटाघाटी सुरू होत्या. त्यावेळी मी मुख्यमंत्री होणार हे जवळपास नक्की होते. मात्र, अजित पवार यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदीच्या नावाला विरोध केला नव्हता, असे आम्हाला सांगण्यात आले, असा गौप्यस्फोट करत, अजित पवार कामांसाठी पुढे असतात. ते एकदम रोखठोक बोलतात. मला त्यांचा स्वभाव आवडतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. बहुमत चाचणीत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना ते बोलत होते.
मी कधीही कोणत्याही पदाची लालसा धरली नाही. यापुढेही करणार नाही. यानंतरही मी सगळे विसरूनही गेलो होतो. मी कोणतीही अपेक्षा धरली नाही. सुरुवातीला मलाच सांगितले होते. मात्र, नंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यास सांगितले. तेव्हाही मी कोणताही आक्षेप घेतला नाही. तेव्हा साहेब तुम्ही पुढे व्हा. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. मात्र, त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. माझ्यासोबत आलेले मंत्रीही सत्तेत असताना बाहेर पडले नसते, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
अजितदादा देखील आमचेच आहेत
एकनाथ शिंदे यांनी भाजप, शिवसेनेच्या आमदारांचा मी मुख्यमंत्री नाही, तर शिवसेनेच्या त्या १५ आमदारांचाही मुख्यमंत्री आहे. एवढेच नाही तर अजितदादा आमचेच आहेत. मी माड्या बांधल्या नाही, हॉटेल बांधली नाहीत. आहेत का हो आव्हाड साहेब, अशा शब्दांच शिंदे यांनी राष्ट्रवादीला कोपरखळी मारली. नगरविकास मंत्री होतो, तेव्हा मी आमदारांना खूप पैसे देत नव्हतो, थोडे थोडे देत होते. कारण काही जण वॉच ठेवून होते, भाजपच्या आमदाराला जास्त पैसे तर देत नाही ना, असा टोलाही त्यांनी शिवसेनेतील ठाकरे गटाला लगावला.
दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर बोलताना, दादांनी शंभर प्लसचे टार्गेट ठेवले होते. जयंत पाटील तर आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सांगायचे पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच. यामुळे आमचे आमदार चलबिचल झाले. ते मला येऊन भेटायचे. मी मोकळाच होतो, यामुळे मी त्यांचे ऐकून घ्यायचो. चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून बाहेरच होते. जिल्ह्यात जात नव्हते. एका पदाधिकाऱ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या घरच्यांकडे गेले, त्याला राष्ट्रवादीत ये एक सुनावणी लावू आणि सगळे गुन्हे रद्द करू, हे जयंत पाटांलाना माहितीय असे मी म्हणत नाही, असेही शिंदे म्हणाले.