Join us

"वेडात वीर मराठे दौडले ४०"; राज ठाकरेंच्या वाक्यावर CM शिंदेंनी हातच जोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 5:38 PM

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मुंबई - मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतले प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांनी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat). नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी बोलताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिग्दर्शकाची उमपा दिली. तसेच, वेडात मराठे वीर दौडले चाळीस... असे म्हणत शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख केला. यावेळी, उपस्थितांमध्ये हशा पिकला, तर एकनाथ शिंदेंनी चक्क हात जोडल्याचे पाहायला मिळाले. 

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. यावेळी त्याचा चित्रपटातील लूकही दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये अक्षय कुमारने मराठीत संवाद साधून सर्वांना चकीत केले.  मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहून अक्षय कुमार म्हणाला की, मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटतो आहे. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. तर, राज ठाकरेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये फटकेबाजी केली. 

वेडात मराठे वीर दौडले चाळीच याचे निर्माते, दिग्दर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यममंत्री एकनाथराव शिंदे, असे म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिंदे गटातील ४० आमदारांचा नाव न घेता उल्लेख केला. तसेच, महेश मांजरेकर खऱ्या अर्थाने वेडात धावणार आहे. प्रत्येक वेळेला एक नवं आणि भव्य स्वप्न घेऊन येतो.  ही गोष्ट मला ५ वर्षांपूर्वी महेशने सांगितली होती. त्यावेळी, हा खूप मोठा सिनेमा कसा होईल हा प्रश्न मलाही होता. पण, महेशला निर्माते भेटले आणि हा मराठीतला सर्वात मोठा सिनेमा तुमच्यासमोर येत आहे. मराठी चित्रपट आज कात टाकतोय, याचं श्रेय मी महेश मांजरेकरांना देतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांचे तोंड भरुन कौतुक केले. 

राज ठाकरेंमुळेच भूमिका मिळाली - अक्षयकुमार

या भूमिकेबद्दल अभिनेता अक्षयकुमार म्हणाला की, मला ही भूमिका राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली. त्यांनी मला ही भूमिका तू केली पाहिजे असे म्हटले आणि मी तयारही झालो. मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळते आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक आहे. पण यासाठी मी कठोर परिश्रम करेन. पुढे अक्षय कुमार म्हणाला की, महेश मांजरेकरांसोबत मी पहिल्यांदाच काम करणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. त्यावर महेश मांजरेकर म्हणाले की, अक्षय कुमारांसोबत काम करायची माझी इच्छा होती आणि या भूमिकेसाठी मला दुसरा कोणी अभिनेता दिसला नाही. कारण या भूमिकेसाठी एक व्यक्तिमत्त्व, लूक हवा होता. त्यासाठी अक्षय कुमार योग्य वाटला.

टॅग्स :एकनाथ शिंदेराज ठाकरेमहेश मांजरेकर