“अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली, आम्ही बहिणींसह भावांनाही न्याय दिला”: CM शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 05:18 PM2024-06-28T17:18:13+5:302024-06-28T17:18:49+5:30

CM Eknath Shinde Reaction On Maharashtra Budget 2024: आमचा अर्थसंकल्प सर्वसमावेश असून, यामुळे विरोधकांचे चेहरे उतरले, ते गॅसवर आले आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

cm eknath shinde reaction on maharashtra budget 2024 | “अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली, आम्ही बहिणींसह भावांनाही न्याय दिला”: CM शिंदे

“अडीच वर्ष त्यांनी लाडका बेटा योजना राबवली, आम्ही बहिणींसह भावांनाही न्याय दिला”: CM शिंदे

CM Eknath Shinde Reaction On Maharashtra Budget 2024: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. आम्ही सर्वसामान्यांचे सरकार म्हणतो, तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला-भगिनी, युवा, ज्येष्ठ, वारकरी सगळे त्यामध्ये येतात. आमचा अर्थसंकल्प पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले होते. दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आहोत. हा निश्चयाचा, निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिली. 

राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. ही योजना अतिशय महत्त्वाची असून, दरमहा दीड हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार आहोत. त्यामुळे विरोधक गॅसवर आले आहेत. युवक बेरोजगार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो. परंतु, आम्ही आल्यावर सरकारी नोकऱ्यांवरील निर्बंध हटवले. जवळपास १ लाख सरकारी नोकऱ्या मुलांना मिळाल्या आहेत. खासगी कंपन्यांमध्ये स्कील डेव्हलपमेंट, स्टार्ट अप आणि अन्य माध्यमातून लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. जर्मनीत चार लाख नोकऱ्यांचा एमओयू आपल्या सरकारसोबत झाला आहे. जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना १० हजार रुपये अप्रेंटिशिप देणार आहोत. हादेखील एक ऐतिहासिक निर्णय आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

अडीच वर्ष त्यांनी लाडला बेटा योजना राबवली...

लाडकी बहीण योजनेवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, लाडका भाऊ योजना का राबवत नाही. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही लाडका भाऊ योजना केली आहे. १० हजार रुपये देत आहोत. पण त्यांनी अडीच वर्षे लाडका बेटा योजना राबवली, त्याचे काय, असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. राज्यातील सर्व मुलींचे शिक्षण मोफत करण्यात येत आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. अजितदादा वाद्याला पक्के आहेत. त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणारे आहेत. आतापर्यंत जे जे बोललो, ते ते पूर्ण करून दाखवले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, अर्थसंकल्पात सर्व पैशांची तरतूद करून या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील. दुधाला ५ रुपये वाढ केली आहे. सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटींची तरतूद केलेली आहे. शेतकऱ्यांना काय दिले, हे विचारणाऱ्यांना सांगू इच्छितो की, गेल्या दोन वर्षांत सगळे निकष बदलून, विविध योजनांच्या माध्यमातून ४५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. खोटे बोला पण रेटून बोला, हेच विरोधकांचे धोरण राहिले आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 
 

Web Title: cm eknath shinde reaction on maharashtra budget 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.