Join us  

CM Eknath Shinde On Dasara Melava : “शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे, योग्य निर्णय होईल”; CM शिंदेंचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 1:29 AM

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला असून, सर्वांचाच त्यासाठी आग्रह आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

मुंबई: मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. शिंदे गटाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पाडली. यामध्ये संघटनात्मक कामांवर भर देण्यात आला असून, त्यासंदर्भातच सविस्तर चर्चा झाल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत सूचक विधान केले आहे. 

शिवसेनेचे नेते, उपनेते यांच्या बैठकीत संघटना बांधणी आणि आगामी काळातील रणनीति यावर चर्चा झाली. सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भातही चर्चा झाली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच शिंदे गटाकडून काढण्यात येणाऱ्या हिंदू गर्व गर्जना यात्रेविषयी दुजोरा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारच्या योजना, कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मंत्री, आमदार, खासदार विभागानुसार जनतेशी संवाद साधतील. गेल्या दोन महिन्यात नव्या शिवसेना-भाजप सरकारने जनहिताचे जे काही निर्णय घेतले, याचीही माहिती या यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे, हा सर्वांचाच आग्रह

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दसरा मेळाव्याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे, ही सर्वांचीच इच्छा आणि आग्रह आहे. त्यावरही चर्चा झाली असून, सकारात्मक निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत परवानगी मागितली आहे. अर्ज केला आहे. जे काही होईल, ते नियमानुसार होईल. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्याला लोकं येतात. आम्हीही त्यांचेच विचार पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे दसरा मेळावा झाला पाहिजे, असेच सर्वांना वाटतेय, असेही एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. याशिवाय कोणाला आमंत्रण असेल, कुणाला नाही, याबाबत निर्णय झाला की, कळवले जाईल, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे ४ नेते आणि २६ उपनेते यांची नेमणूक करण्यात आली.पक्ष मजबूत करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल त्यांनी उचलले आहे. यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यापूर्वी, मुंबई आणि ठाण्यातील एकूण ९ विभागप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेना