Join us

अमरावती हत्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “नक्कीच ही घटना...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 11:43 AM

अमरावती हत्येप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषितांविषयी केलेल्या विधानाचे अद्यापही देशभरात पडसाद उमटत आहे. उदयपूरमध्ये नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या. यानंतर अमरावतीत झालेल्या एका हत्येचा संबंध नुपूर शर्मा यांच्या समर्थनाशी जोडला जात आहे. यातच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हत्येप्रकरणी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर संदेश केल्यामुळेच हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे नाकारले होते आणि पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला होता. आता मात्र पोलिसांनी हत्येच्या घटनेचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे. कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

ही घटना नक्कीच चिंताजनक आहे

एकनाथ शिंदेंनाअमरावतीमधील घटनेसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ही घटना नक्कीच चिंताजनक आहे. ज्यांनी हत्या केली आहे त्या सर्वांना अटक करण्यात आले असून एनआयएने तपास हाती घेतली आहे. ही घटना राष्ट्रीय स्तरावरील असून सरकारचंही त्यावर लक्ष आहे. 

दरम्यान, कोल्हे यांनी सोशल मीडियावर नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारा संदेश प्रसारित केला होता. तपासात ही घटना नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून उर्वरित तपास सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली. मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम, शाहरुख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान, अब्दूल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम, शोएब खान उर्फ भुऱ्या साबीर खान, अतिब रशीद आदिल रशीद आणि युसूफ खान बहादूर खान अशी आरोपींची नावे आहेत. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेअमरावती