Maharashtra Politics: BKCवर दसरा मेळाव्याचे भाषण सुरु असतानाच लोक निघून गेले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 11:59 AM2022-10-08T11:59:53+5:302022-10-08T12:00:30+5:30
Maharashtra News: बीकेसीवर दसरा मेळाव्याला दोन लाखांहून अधिक लोक जमली होती, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे.
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. मात्र, यानंतर राजकीय घमासानही झाल्याचे पाहायला मिळाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे दिसत आहे. यातच एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच शेकडो लोकांनी बीकेसीचे मैदान सोडल्याचा दावा केला जात आहे. यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला. या मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना लोक उठून निघून जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचा व्हिडिओंवरुन विरोधकांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी या व्हायरल व्हिडिओंवर आणि भाषण सुरु असताना लोक निघून गेल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आमच्यासाठी बाळासाहेब वंदनीय आहेत. आम्ही त्यांना आमचे दैवतच मानतो. कोणी कितीही काही म्हटले, तरी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. याच कारणामुळे राज्याबरोबरच देशभरातील लोक आम्हाला सोबत करत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
बीकेसीवर दोन लाखांहून अधिक लोक जमली होती
कोणी ते व्हिडिओ व्हायरल केले ट्वीस्ट करुन. ते जाऊ द्या. पण शेवटी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले. बीकेसीमध्ये किती लोक आले होते? का आले होते? जर आम्ही चुकीचे काम केले असते तर एवढी लोकं समर्थनाला आली असती का? अशी विचारणा करत, इतकच नाही तर बीकेसीवर दोन लाखांहून अधिक लोक जमली होती, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केला.
दरम्यान, बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी एसटी बसेस, तसेच मेळाव्याच्या प्रमोशन, जाहिरात, समर्थकांच्या खाण्याची सोय आदींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च केले. नोंदणी नसलेल्या एका पक्षाकडे इतकी रक्कम कशी आली? त्यांच्या वतीने कोणी खर्च उचलला? त्यांच्या पैशाचा स्रोताबाबत मनी लाँड्रिंग ॲक्ट व आयकर कायद्याच्या तरतुदीअंतर्गत चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वादात सापडण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"