CM Eknath Shinde Reaction on Ajit Pawar DCM Oath: महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३५ आमदारांच्या गटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
राज्यात दुपारनंतर अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजभवनावर पोहोचले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
डबल इंजिनचे सरकार आता ट्रिपल इंजिन झाले आहे
आता महाराष्ट्राला १ मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री आहेत. डबल इंजिनचे सरकार आता ट्रिपल इंजिन झाले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत करतो. अभिनंदन करतो. अजित पवारांचा अनुभव महाराष्ट्राला बळकट करण्यास मदत करेल. अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. अशा प्रकारच्या घडत असतात, हे यापूर्वीही आपण पाहिले आहे. यापुढे सरकारचे कामकाज आणखी वेगवान होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेला याचा फायदा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर यांनी विश्वास ठेवला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्रिमंडळात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांना ४-५ जागाही मिळणार नाहीत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.