Maharashtra Politics: “पोलीस नियमांनुसार कार्यवाही करतील, राजकीय सूडभावनेतून कारवाई नाही”: CM शिंदे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 06:19 PM2022-11-14T18:19:38+5:302022-11-14T18:20:55+5:30
Maharashtra News: हे कायद्याचे राज्य आहे. कोणत्याही परिस्थिती कायदा हातात घेणे खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलीस नियमांनुसार गुन्ह्याची चौकशी करतील. या प्रकरणी तपास करतील. पडताळणी करतील. जी काही तक्रार आहे, त्यात तथ्य असेल किंवा नसेल, त्याप्रमाणे पोलीस पुढील कार्यवाही करतील. आमच्या सरकारने राजकीय सूड भावनेपोटी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि करणारही नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कायदा हातात घेणे कोणत्याही परिस्थिती खपवून घेतले जाणार नाही
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबई-नाशिक हायवेवर जाळपोळ करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, हे कायद्याचे राज्य आहे. सरकार नियमांनुसार चालते. लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाऊ शकते. परंतु, कायदा हातात घेणे कोणत्याही परिस्थिती खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव पोलिसांवर नाही, तसा दबाव टाकलाही जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
दरम्यान, राजकीय षड्यंत्र रचले गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला असून, यावर बोलताना, कोणी षड्यंत्र रचले, ते त्यांनाच विचारा. असे षड्यंत्र कोणीही रचलेले नाही. जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. ठाण्यातील एका कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो. पुन्हा एकदा सांगतो की, तक्रारीत काय तथ्य आहे किंवा नसेल, तर त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"