Join us  

“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 6:18 PM

CM Eknath Shinde: चांगल्याला चांगले कधी विरोधी पक्षाने म्हटले असे माझ्या ऐकिवात नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

CM Eknath Shinde: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही हे सरकार स्थापन केले, तेव्हा अनेकांनी हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी केली होती. काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. मात्र, आमचे सरकार पडले नाही. पण महायुती सरकारची कामगिरी बघून विरोधकांचे चेहरे पडले आहेत. २०१९ मध्ये जनमत पायदळी तुडवून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. मात्र, आम्ही जनमताचा आदर करत महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. तसेच विरोधकांना कानपिचक्या दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील महाविकास आघाडीतील स्पर्धेत सर्वांत पुढे आहेत. त्यामुळेच नाना पटोले फिल्डवर जाऊ लागले आहेत. जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीने फेक नेरेटिव्ह पसरवले

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नेरेटिव्ह पसरवले. त्यामुळे आम्ही कमी पडलो. महाविकास आघाडीने संविधान बदलणार म्हणून जनतेचा मनात गैरसमज निर्माण केला. तुमच्या फेक नेरेटिव्हला आम्ही कामाने उत्तर देणार आहोत. आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी ज्येष्ठांसाठी योजना आणल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब नेहमी सांगायचे चांगल्याला चांगले म्हणा. चुकत असेल तिथे सूचना करा. परंतु चांगल्याला चांगले कधी विरोधी पक्षाने म्हटले असे माझ्या ऐकिवात नाही. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना म्हणजे महायुतीच्या भावंडांकडून माताभगिनींना आहेर आहे. ४६ हजार कोटी रुपये राज्यातील माता भगिनींना देण्याचे काम सरकार करणार आहे. याबाबत विरोधकांना आनंद व्हायला पाहिजे होता. जनतेला द्यायचे म्हटले की, विरोधकांच्या पोटात का दुखते? हे मला समजले नाही, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 

टॅग्स :विधानसभाएकनाथ शिंदेशिवसेनामहाविकास आघाडीमहायुती