Maharashtra Budget Session: ‘खतासाठी जात’ प्रकारावरून विधानसभेत खडाजंगी; मविआ नेते आक्रमक, मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 01:36 PM2023-03-10T13:36:27+5:302023-03-10T13:38:06+5:30
Maharashtra Budget Session: सांगलीत खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले.
Maharashtra Budget Session: राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली. सांगली येथील खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. मात्र, या प्रकरणामुळे विधानसभेत जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.
सांगलीत शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदीच्या आधी त्याची जात कोणती हे विचारले जात आहे. खताची खरेदी करताना जात सांगण्याची गरज काय हे सरकारने स्पष्ट करायला हवे. आम्ही विचारले तर सांगितले की सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे. त्यात जातीचा रकाना नव्याने टाकला आहे. तो भरल्याशिवाय खत खरेदीची प्रक्रिया पुढे जात नाही. जातीचे लेबल पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये चिटकवण्याचा प्रयत्न सरकारने करता कामा नये, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवारांच्या प्रतिक्रियेवर नाना पटोले संतप्त
यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधक राईचा पर्वत करत असल्याचे म्हटले. यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले चांगलेच संतप्त झाले. मुनगंटीवार म्हणाले की, राईचा पर्वत केला जात आहे. त्यांनी मान्य केले की, केंद्राने तसे आदेश दिले, त्यात आम्ही सुधारणा करत आहोत. खत घेण्यासाठी शेतकऱ्याची जात विचारली जाते आणि मंत्री म्हणतायत की तुम्ही राईचा पर्वत करताय. तुम्हाला काहीतरी वाटले पाहिजे, या शब्दांत नाना पटोले यांनी आपला संताप व्यक्त केला.
विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची खडाजंगी सुरू असताना या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. ते केंद्र सरकारचे पोर्टल आहे. आपण केंद्राला जातीचा रकाना वगळण्यात यावा, असे कळवत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच नाना पटोलेंचा राग आपण समजू शकतो. शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण जे सकारात्मक निर्णय घेतले त्यामुळे विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. त्यामुळे त्यांच्याकडे काही राहिले नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
दरम्यान, सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आलेला बदल फक्त सांगलीसाठी करता येणे शक्य नाही. हा बदल केंद्र सरकारच्या आदेशाने करण्यात आलेला आहे. नेमका हा आदेश का देण्यात आला? जातीपातीला प्रोत्साहन दिले जात आहे का, अशी विचारणा काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"