CM Eknath Shinde: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. यापूर्वी सकाळच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये सरकारला दिलेल्या पाठिंबावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँड निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करताच अजित पवार चांगलेच संतप्त झाले. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मंत्रीमहोदयांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायला हवे असे नाही. राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना. ही कुठली पद्धत काढली? तुमच्या हातात आहे ना? मग करा ना चौकशी. कारण नसताना कुणावरही कसलेही आरोप का करताय, असा सवाल अजित पवारांनी केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.
तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता.. ऐका..
अजितदादा, गुलाबराव पाटलांनी नागालँडचा विषय काढला, तो विषय नव्हता खरंतर. पण जसे तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता.. आता ऐका.. तुम्हीही ऐकायची सवय करा. एवढेच आहे की, जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात. तुम्ही आत्तापर्यंत बोलत होतात की बदलाचे वारे वाहात आहेत. गुलाबराव पाटलांनी एवढेच विचारले की हे बदलाचे वारे आहेत का, असा खोचक सवालही एकनाथ शिंदे यांनी केला.
शरद पवार जे बोलतात, त्याचे उलटे घडले हे आपल्याला माहिती आहे
शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत. ते आत्तापर्यंत जे काही बोलले, त्याच्या नेमके उलटे घडले आहे, हे आपल्याला माहिती आहे. कसब्याची पोटनिवडणूक जिंकली पण त्याचवेळी तीन राज्य भाजपने जिंकली हे शरद पवार विसरले, असे सांगताना, तुम्ही म्हणालात की सर्वसामान्य लोकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवली. मग पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसामान्य नव्हते का? त्यांनी तर तुमच्या बालेकिल्ल्यात तुम्हाला जागा दाखवली. अजितदादा, तसे तुम्ही चांगले आहात. रोखठोकमध्ये आहात. पण तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. समोरच्याला बरोबर लागेल असे. पण तसे होत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला.
दरम्यान, नागालँडमध्ये पाठिंबा न मागताही तुम्ही दिला. २०१४लाही तुम्ही इथे ते केले होते. त्याामुळे शीशे के घरों में रहनेवाले दुसरों के घरोंपर पत्थर नहीं फेंका करते. सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडे असतात. आम्ही बोलत नाही. पण समोरुनही रोज रोज तुम्ही बोलत राहाल, तर उत्तर मिळणार, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"