मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले आहेत. यातच आता बंडखोर आमदार ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने समर्थपणे उभे असल्याचे दाखवत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकाकारांच्या टीकेचा स्पष्ट शब्दांत समाचार घेतला.
गेल्या काही दिवसांत आमच्याबद्दल काय काय बोलतायत, त्याला काही तंत्र राहिलेले नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर एकमेकांमध्ये भांडतील, उरावर बसतील वगैरे काय ही त्यांची बोलणी. काही जणांनी तर आमच्यात फूट पडावी, मतभेद व्हावेत, यासाठी देव पाण्यात ठेवलेत. पण, आमचे आमदार घट्ट आहेत, आमच्यात मतभेद होणार नाहीत, पण हेच आमदार तुमच्यावर भारी पडतील. माझ्याकडे अनेक कलाकार आहेत, काय करतील ते कळणारही नाही, असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी विधिमंडळात केलेल्या भाषणाचे कौतुक केले. मला म्हणाले, मी तुमचे एक तासाचे संपूर्ण भाषण ऐकले. तुम्ही अगदी मनापासून भाषण केले. तसेच महाविकास आघाडीने घेतलेला नामांतराचा निर्णय हा बेकायदेशीर होता. सरकार अल्पमतात असताना केलेला तो निर्णय होता. मात्र, लवकरच कॅबिनेटमधील बैठकीत संभाजीनगर, धाराशीव तसेच दि. बा. पाटील नावांचा प्रस्ताव पुन्हा मंजूर करू, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची केले. मग आम्ही बंडखोर कसे? आमदारांच्या भावना अनेकदा बोलून दाखवल्या पण ऐकून घेतल्या गेल्या नाहीत. सत्तेत असूनही आपला पक्ष चौथ्या क्रमांकावर जात होता हे पाहून काळीज तुटत होतं. मग छातीवर दगड ठेवून शिवसेनेला वाचविण्यासाठी निर्णय घेतला. शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला आणि त्याला ५० आमदारांनी पाठिंबा दिला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.