“बोलघेवडेपणा करुन जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही”; CM शिंदेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 10:40 AM2024-01-16T10:40:46+5:302024-01-16T10:41:43+5:30
CM Eknath Shinde Reply Aaditya Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री १ वाजण्याच्या सुमारास दावोस दौऱ्यावर गेले.
CM Eknath Shinde Reply Aaditya Thackeray: दावोस दौऱ्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यातील काही प्रश्न उपस्थित करत शिंदे सरकारवर निशाणा साधला. दावोस दौऱ्याला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
जे लोक जात आहेत ते महाराष्ट्राच्या हितासाठी चालले आहेत का? परराष्ट्र खात्याने ५० लोकांची संमती दिली आहे का? १० लोकांची संमती काढून ४० लोक जास्त का नेले जात आहेत? आज मुख्यमंत्री कार्यालयाने प्रेस नोट काढून हे सांगावं की नेमकी किती लोकांना संमती देण्यात आली आहे? तिथले फोटो आणि व्हिडीओही येऊ शकतात. मागच्या दौऱ्यांमध्ये काय घडले, अशी विचारणा करत आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना, टीकेला उत्तरे दिली.
बोलघेवडेपणा करुन जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही
उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय असे १० लोकांचे शिष्टमंडळ दावोसला जाते आहे. MMRDA आणि महाप्रीन असे आठ लोक जात आहेत. त्यांनाही केंद्राकडून संमती मिळाली आहे. त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही. जे करारनामे होतील त्याची अंमलबजावणी होईल. ते काय बोललेत याबद्दल काही बोलायची आवश्यकता नाही. कारण त्यांनी जे सामंज्यस करार केले ते करार आणि प्रत्यक्षात सुरु झालेली कामे ही महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहेत. फक्त बोलघेवडेपणा करुन महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकता येणार नाही. जे करार आम्ही करु त्याची अंमलबजावणी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
दावोस दौऱ्याबाबत विरोधकांनी केलेली टीका ही संपूर्णपणे निरर्थक
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून तीन लाख दहा हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. तसेच इतर देशांचे मंत्री तसेच मोठ्या कंपन्या आणि वित्तीय संस्थांशी चर्चा करून राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू. दावोस दौऱ्याबाबत विरोधकांनी केलेली टीका ही संपूर्णपणे निरर्थक असून या दौऱ्यात कोणताही अनाठायी खर्च करण्यात आला नसून जो खर्च होईल त्यातील प्रत्येक रुपयाचा तपशील सर्वसामान्य लोकांपुढे आणला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी तीन दिवसांचा दौरा आम्ही करतो आहोत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे, यासाठी चांगला फोरम दावोस या ठिकाणी मिळतो. महाराष्ट्राचे ब्रांडिंग करणे, शोकेसिंग करणे याची ही संधी असते. त्याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राकडे वेगळ्या अपेक्षेने जगातले लोक पाहात आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात विदेशी कंपन्या आग्रही आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामंज्यस करार होतील. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.