“देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा, मलाही अनेक गोष्टी माहिती”: CM शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 12:20 PM2023-06-25T12:20:59+5:302023-06-25T12:22:05+5:30
CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरेंचा कृतघ्नपणा आहे. केवळ बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले.
CM Eknath Shinde News: आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या तीन दिवसांनंतर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांमध्ये शवासनावरून शनिवारी वाक्युद्ध रंगले. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीसांकडेउद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा आहे. केवळ बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. मलाही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मी अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. मीडियाशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारवर दररोज खालच्या पातळीवरील आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्वांवर आरोप केले जात आहेत, पातळीसोडून बोलले जात आहे. हे सर्वजण पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी माझा नातू रुद्रांशलाही राजकारणात ओढले गेले. त्या लहान मुलाला राजकारण काय कळते. मी त्यांची लायकी म्हणणार नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा या माजी मुख्यमंत्र्यांना मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना मदत केली आहे. त्यांनी याची किमान जाणीव तरी ठेवली पाहिजे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा
देवेंद्र फडणवीसांबरोबर मी काम केले आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. हे कसला आरोप करत आहेत. देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा आहे. केवळ बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि किंबहुना आत्ताही त्यांनी उद्धव ठाकरेंना मदत केली. हा केवळ कृतघ्नपणा आहे. मलाही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मी अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. मी त्या गोष्टी इथे बोलू इच्छित नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘समझनेवाले को इशारा काफी हैं’. मुंबईत चौकशी सुरू आहे त्यावरूनच हे सर्व सुरू आहे. ही चौकशी सरकार करत नाही. ही चौकशी ईडी करत आहे. हे का घाबरत आहेत? कर नाही तर, डर कशाला? त्यांनी चौकशीला सामोरे जावे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.