“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:07 PM2024-06-26T22:07:38+5:302024-06-26T22:08:04+5:30
CM Eknath Shinde Replied Uddhav Thackeray: विरोधकांनी जंग जंग पछाडले. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. हा मोदींचाच विजय आहे. इंडिया आघाडीचा पराभव आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
CM Eknath Shinde Replied Uddhav Thackeray: विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. या विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले. अनेक मुद्दे उपस्थित करत सरकारवर टीका केली. या टीकेला सरकारकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले.
विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. या निवडणुकीत मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना महायुती सरकारवर टीका केली होती. उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. महायुतीच्या खोके सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन आहे. उद्या माध्यमांशी बोलताना राजकीय विषयाबाबत भूमिका मांडेन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याबाबत महायुतीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत पलटवार केला.
निरोप देण्यासाठी सभागृहात तर यायला पाहिजे ना...
स्वाभिमान कुठे गहाण टाकला? लोकांच्या मनातले सरकार आम्ही बनवले. आज त्यांच्यापेक्षा आम्हाला लोकांनी जास्त मते दिली. काही लोक म्हणाले की, हे निरोपाचे अधिवेशन आहे. आता निरोप देण्यासाठी सभागृहात तर यायला पाहिजे ना? की फेसबुक लाईव्हवरूनच निरोप देणार? निरोप द्यायचा की घ्यायचा हे जनता ठरवत असते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाकरे गटाबाबत सांगायचे झाले तर आम्ही १३ जागा लढलो. त्यातील ७ जागा आम्ही जिंकलो. एकूण १९ टक्के मतांपैकी १४.५० टक्के मते धनुष्यबाणाला मिळाली. मग तुमच्याकडे किती टक्के मते राहिली. आता आलेली ही सूज आहे. ही सूज उतरेल. तुम्ही दिशाभूल करून मत मिळवलेली आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली.
शेवटी नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले
विरोधी पक्ष गोंधळलेला आहे. तुमच्यासमोर आले असतील आणि म्हणाले असतील की, महायुतीला लोकसभेत यश मिळाले नाही, त्यामुळे सत्ताधारी पोकळ आश्वासनाची घोषणा करतील. नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले. संविधान बदलणार, असे खोटे नरेटिव्ह सेट केले. आरक्षण जाणार असे म्हटले. यामध्ये त्यांना क्षणिक आनंद मिळाला असेल. एवढे सर्व करून काय झाले? शेवटी नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले. त्यामुळे मोदी जिंकले आणि इंडिया आघाडीचा पराभव झाला. तरी सुद्धा आमचे काही लोक दुसऱ्यांच्या वरातीत घोड नाचवणारे आहेत, असा खोचक टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, विरोधकांनी एवढे करूनही काँग्रेसला फक्त ९९ जागा मिळाल्या. म्हणजे तीन टर्ममध्ये ४०, ५० आता ९९. मग आता तुम्हाला २४० पर्यंत पोहण्यासाठी २५ वर्ष लागतील. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायचे काम केले. आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पाडणारे लोक नाहीत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ. त्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकेल. मुंबईला विरोधकांनी खड्यांत टाकण्याचे काम केले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.