"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:54 PM2024-10-14T12:54:28+5:302024-10-14T13:14:15+5:30
मुंबईच्या पाचही टोल नाक्यांवर लहान वाहनांना टोल माफी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली
CM Eknath Shinde on Toll : मुंबईच्या सीमेवर असलेल्या पाचही टोल नाक्यांवर महाराष्ट्र सरकारकडून लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडका प्रवासी योजना आम्ही सुरु केल्याचे म्हटलं आहे.
मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड-एलबीएस, ठाणे या टोलनाक्यावर आता लहान वाहनांना टोल भरावा लागणार नाही. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही. या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना ४५ रुपये टोल भरावा लागत होता. महाराष्ट्र सरकारने हा टोल लागू केला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा टोल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
"गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी होती की, मुंबईच्या सीमेवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे टोलमधून सूट मिळावी. मी जेव्हा आमदार होतो तेव्हा टोलमाफीसाठी आंदोलन करुन कोर्टात गेलो होतो. मला आनंद आहे की लाखो लोकांना या टोल माफीमधून दिलासा मिळणार आहे. हलकी वाहने आपण टोलमधून वगळली आहेत. त्यामुळे वेळ आणि इंधन वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल. या सगळ्याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे. मुख्यमंत्री लाडका प्रवासी योजना देखील आज आम्ही केली आहे. ही अनेक वर्षांपासून मागणी होती," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"हा निर्णय निवडणुकीपूरता नाही. हा निर्णय कायमस्वरुपी आहे. राजस्थान, कर्नाटक, हिमाचलमध्ये आश्वासन दिलं आणि निवडणुका जिंकल्यानंतर आमच्याकडे पैसे नाहीत सांगितले. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक आधार त्यांना नाही. आम्ही कुठल्याही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणणेल्या नाहीत. ही जनतेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती आणि ती पूर्ण केल्याचे समाधान आम्हाला आहे. या सर्व कामांची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्की देईल," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईमध्ये बाहेरुन येणाऱ्यांची दादागिरी खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री शिंदे
"आमच्या काळात पोलिसांनी आरोपीवर गोळी चालवली तर विरोधक गोळी का चालवली असं विचारतात. हे डबल ढोलकी लोक आहेत. यांना कोणतीही नैतिकता नाही. बदलापूरमध्ये अत्याचार करणाऱ्याची बाजू घेणारे हे लोक नैतिकतेविषयी बोलतात. आम्ही बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देणार आहोत. फरार आरोपीला शोधण्याचे काम करणार आहोत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची विनंती करु. कारण मुंबईमध्ये बाहेरुन येऊन दादागिरी करणं आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देऊ," असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.