जगभरात PM मोदींचे नाव आदराने घेतात, त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला: CM एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:16 AM2024-01-19T11:16:34+5:302024-01-19T11:20:40+5:30

CM Eknath Shinde Davos Tour: एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत परतल्यावर दिली.

cm eknath shinde return back from davos tour and express experience at mumbai airport | जगभरात PM मोदींचे नाव आदराने घेतात, त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला: CM एकनाथ शिंदे

जगभरात PM मोदींचे नाव आदराने घेतात, त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला: CM एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde Davos Tour: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला. या वर्षी ३ लाख ५३ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षरीत झाले. जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार स्वाक्षरीत होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी सारस्य दाखविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दिली. दावोस दौऱ्याहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परतले.  

जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य व केंद्र शासनाचे शिष्टमंडळ दावोस येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. मुंबई विमानतळावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभूतपूर्व स्वागत केले.

एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला 

अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर,  दक्षिण कोरिया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यूएसई, ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली. त्याचबरोबर आर्सेनिल, मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या  कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मागील वर्षी दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी ७५ ते ८० टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले. या करारामुळे २ लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहेत. जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, खार उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे. जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात १ लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगितले.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधामुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव आला. राज्यात पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या उत्तम सुविधा, कुशल मनुष्यबळ असून, महाराष्ट्रात एक इको सिस्टिम आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन, डॉयनॅमिक लिडरशीप, ग्लोबल लिडर म्हणून त्यांची ओळख झाली असल्याचे दावोस दौऱ्यात अनेक देशातील लोकांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जगभरात असून त्यांचे नाव लोक आदराने घेतात. परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाला. गतवर्षीप्रमाणेच यावर्षी  केलेले करार पूर्णत्वास नेण्याकडे सरकारचा कटाक्ष राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: cm eknath shinde return back from davos tour and express experience at mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.