Join us

मुंबईसह राज्यातील अतिवृष्टीचा CM शिंदेंनी घेतला आढावा; म्हणाले, “नागरिकांनी सहकार्य करावे”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 2:11 PM

CM Eknath Shinde News: मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde News: मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून, बाधित झालेली रेल्वे वाहतून हळूहळू पूर्ववत होत आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करत, मुंबईत जवळपास साडे चारशेवर पंप सुरू आहेत. त्यातून पाण्याचा निचरा होत आहे. त्यामुळे हिंदमाता, मिनल सबवे येथे पाणी साचलेले नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच रेल्वे रुळांवर काही ठिकाणी मायक्रो टनेलिंगचे काम करण्यात आले. अशा प्रकारचा प्रयोग देशात प्रथमच करण्यात आला. या मायक्रो टनेलिंगचा फायदा झाला. मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल या ठिकाणची वाहतूक आता सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एनडीआरएफ प्रमुखांसह आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सची चर्चा

सकाळपासूनच रेल्वेसह अन्य यंत्रणांच्या संपर्कात होतो. तसेच राज्यातील पावसाचा आढावा घेतला. रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. एनडीआरएफ प्रमुखांशी सकाळी चर्चा केली. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या दलांशीही चर्चा केली. त्यांनाही अलर्ट राहण्याची सूचना करण्यात आली आहे. कुठे काही झाले आणि त्यांची मदत लागली, तरीही ती आपल्याला घेता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ही राजकारणाची नाही, तर सामान्य जनतेला मदत करण्याची वेळ

मुंबईतील ५ हजार ठिकाणे शोधली आहे. तेथील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येतील. अनेक ठिकाणी अधिकारी स्पॉटवर आहेत. सगळे एकत्र काम करत आहेत. विरोधकांनी यावरून राजकारण करू नये. राजकारण करायची माझी इच्छा नाही. ही वेळ राजकारण करण्याची नसून, सामान्य जनतेला मदत करण्याची आहे. त्यांना अधिकाधिक मदत कशी मिळू शकेल, हे पाहिले जात आहेत. आधीच्या अडीच वर्षांत काय काय झाले, हे मीही काढू शकतो. परंतु, त्यात मला जायचे नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, या बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर,  मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ‌. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई मान्सून अपडेट