“बाबूजी म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं रत्न”; स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याला CM शिंदेंची मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 07:41 PM2024-07-02T19:41:14+5:302024-07-02T19:45:59+5:30
बाबूजींचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी, मला काय मिळाले, यापेक्षा मी देशाला काय दिले, असा विचार करणारे बाबूजी होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मुंबई: स्वातंत्र्यसेनानी, मुत्सद्दी राजकारणी आणि पत्रकार असा त्रिवेणी संगम फार कमी पाहायला मिळतो. परंतु तो बाबूजींच्या ठायी होता. हेच त्यांचे मोठेपण आहे. या गुणांमुळे आणि त्यांच्या धडाडीमुळे महाराष्ट्राला एक रत्न म्हणजे जवाहर मिळाले. एखाद्या मौलिक रत्नाप्रमाणे बाबूजी होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला असेच दिमाखदार पैलू होते. मला काय मिळाले, यापेक्षा मी देशाला काय दिले, असा विचार करणारे बाबूजी होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त १०० रुपयांच्या स्मृती नाण्याचे विमोचन यशवंतराव चव्हाण सभागृहात एका शानदार सोहळ्यात संपन्न झाले. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, भाजपा नेते मंगलप्रभात लोढा व्यासपीठावर उपस्थित होते. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि 'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील किंवा देशातील अशा व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत असताना तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही केला नाही. चांगल्याला चांगले म्हणणे आणि त्याचा सत्कार करणे, सन्मान करणे. त्याचाच एक भाग म्हणून बाबूजींच्या नावाचे १०० रुपयांचे नाणे काढले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सामाजिक ऋण फेडण्याचे काम सुरू ठेवले
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधी यांच्या संदेशानुसार ‘चले जाव’ आंदोलनात बाबूजींनी सहभाग घेतला. याबद्दल त्यांनी एक वर्ष नऊ महिन्याचा कारावास भोगला. यवतमाळ ही त्यांची जन्मभूमी. परंतु आपल्या कर्तृत्वाने देशाला एक नवी ओळख मिळवून दिली. बाबूजींच्या ठायी सामाजिक बांधिलकी आणि आपण देश तसेच समाजाला देणे लागतो, अशी ठाम भूमिका होती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. बाबूजींनी चळवळीसोबत पत्रकारितेतही स्वतःला वाहून घेतले होते. लोकमत सुरू केले. लोकमतने महाराष्ट्राला माध्यम क्षेत्रासह नव्या जगाचे दर्शन घडवले आहे. यामध्ये विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांचे मोठे योगदान आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही. बाबूजींनी लोकमतच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्याचे काम सुरूच ठेवले. बाबूजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवला. त्यांनी अनेक विभागांचे अतिशय उत्तमपणे सांभाळले. यावरून त्यांच्या कामाचा अवाका, व्यासंग आणि अभ्यास लक्षात येतो. त्यांचे यवतमाळमधील स्मारक प्रेरणादायी ठरते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
लोकमतने माध्यम विश्वात अढळ स्थान निर्माण केले आहे
बाबूजी रसिक होते, दर्दी होते, उत्तम वाचक होते. कला, सांस्कृतिक अभिरुची जपणारे होते, म्हणून लोकमतने देखील आपल्या विविध व्यासपीठांवरून या महाराष्ट्राचे कला-सांस्कृतिक वैभव वाढवणाऱ्या गोष्टींना नेहमी प्रोत्साहन देण्याचे काम केले. तसेच पुढाकारही घेतला आहे. पूज्य बाबूजींनी लावलेल्या लोकमतच्या रोपट्याचा माध्यम समूदाय म्हणजेच वटवृक्ष झालेला आहे. या लोकमतने माध्यम विश्वात अढळ स्थान निर्माण केले आहे. लोकमतविषयी आदराचे आणि विश्वासाचे स्थान खऱ्या अर्थाने निर्माण झाले आहे. बाबूजींचा वसा आणि वारसा दर्डा परिवारातील तिसऱ्या, चौथ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
बाबूजींचे समर्पित जीवन असेच खणखणीत नाणे
बाबूजींचे समर्पित जीवन असेच खणखणीत नाणे होते. आजही आपले अमूल मूल्य त्यांनी टिकवून ठेवले आहे. या महान व्यक्तिमत्त्वाच्या अनेक आठवणी असतील. त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केले, ते भाग्यवान आहेत. सुशील कुमार शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनीही काही आठवणी सांगितल्या. समाजकारण, राजकारण, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जपण्यात माध्यम म्हणून लोकमतने जाणीवपूर्ण योगदान दिलेले आहे. बाबूजींनी दिलेले संस्कार आणि उच्च विचार, रुजवलेल्या मूल्यांचा दर्डा परिवार परिपाक आहे. दर्डा परिवाराला धन्यवाद देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्य सेनानी आणि माजी मंत्री जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त, १०० रुपयांच्या नाण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
नाणे लोकर्पण करणे हा राज्यासाठी आनंद सोहळा असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. pic.twitter.com/w5ycJQ18V9— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 2, 2024