मुंबई : मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्यात होणार असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केल्यानंतर भाजप व शिवसेनेतील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तथापि, रविवारच्या विस्तारात केवळ राष्ट्रवादीलाच संधी मिळाल्याने या आशेवर पाणी फिरले आहे.
कालपर्यंत असे म्हटले जात होते की राज्यात रिक्त असलेल्या २३ मंत्रिपदांपैकी तीन रिक्त ठेवली जातील आणि उरलेल्या २० पैकी १२ ते १३ भाजपला तर ७ ते ८ शिंदे गटाला दिली जातील. मात्र, रविवारी अचानक राष्ट्रवादीची एन्ट्री झाली आणि त्यांना ९ मंत्रिपदे मिळाल्याने आता आणखी १४ जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.
लवकरच आणखी विस्तार : मुख्यमंत्री राष्ट्रवादीला यापुढे एकही मंत्रिपद दिले गेेले नाही तर भाजप-शिवसेना यांच्या वाट्याला १४ मंत्रिपदे आणखी येऊ शकतात. त्यात भाजपला ८ ते ९ आणि शिंदे गटाला ५ ते ६ इतकीच मंत्रिपदे जातील. भाजपसोबतच शिंदे गटातही इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यांची मंत्रिपदाची आशा आजतरी भंगली आहे, लवकरच आणखी विस्तार केला जाईल असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र इच्छुकांच्या आशा कायम ठेवल्या आहेत.