“मुंबईला शांघाय नाही तर सर्वोत्तम शहर बनवायचंय!” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 07:26 AM2022-10-16T07:26:50+5:302022-10-16T07:28:04+5:30
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम महामार्ग जोडून मुंबईत झिरो ट्रॅफिकची संकल्पना राबवण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: काही लोक मुंबईला शांघाय बनवायला जात होते, पण ते राहून गेले. आपल्याला मुंबईचे शांघाय नको तर स्वच्छ आणि सुंदर मुंबई हवी आहे. सरकार बदलले आता मुंबईसुद्धा लवकरच बदलेल, भविष्यात मुंबईला सर्वोत्तम आंतराष्ट्रीय शहर बनवायचे आहे, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
एमएमआरडीएतर्फे मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी मेट्रोपॉलिटन रिजन परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिसंवादात माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंबईला जागतिक दर्जाचे आर. शहर बनवायचे आहे अशी चर्चा पूर्वीपासून होत आली आहे. पण आता तसे करण्याची वेळ आली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून मेट्रो, झिरो ट्रॅफिकची संकल्पना मोनो, कोस्टल रोड, मुंबईतील रस्ते यावर बारकाईने लक्ष देणे फार गरजेचे आहे. राज्य सरकार त्या दृष्टीने कामाला लागले असून हे सर्व प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या
कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कालिदास कोळंबकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. श्रीनिवास, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व इतर अधिकारी उपस्थित होते.
झिरो ट्रॅफिकची संकल्पना
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम महामार्ग जोडून मुंबईत झिरो ट्रॅफिकची संकल्पना राबवण्यात येणार आहे. मुंबई-गोवा कोस्टल रोडचेही दुपदरीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या परिषदेत सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ मंडळींनी मुंबईतील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी विस्तृत चर्चा केली. या परिषदेत मांडण्यात आलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे या परिषदेचा हेतू साध्य झाला. - राहुल शेवाळे, खासदार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"