CM Eknath Shinde News: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला विनम्रपणे अभिवादन केले. तसेच चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन हे प्रदर्शन पाहिले.
मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबानी आपल्या सर्वांना दिला आहे. राज्य शासनाने इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे. नागपूरमधील दीक्षा भूमीचे जतन, संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करून शासनाने बाबासाहेबाना खरी मानवंदना दिलेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कुणी कितीही प्रयत्न केले तरी संविधान बदलणे अशक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे, राज्यातही हा दिवस साजरा होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र कुणी कितीही प्रयत्न केले तरीही ते अशक्य असल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. उलट असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते याची आठवण त्यांनी करून दिली.